समर्थ रामदासस्वामींची कीर्ती ऐकल्यावर शिवाजी महाराजांना
त्यांच्या दर्शनाची ओढ लागली. त्यांच्या भेटीसाठी ते कोंढवळच्या घळीत
गेले. तेथे भेट होईल, या आशेने संध्याकाळपर्यंत थांबूनही महाराजांना
स्वामींची भेट झाली नाही. नंतर प्रतापगडावर आल्यावर रात्री झोपेतही
महाराजांच्या मनात तोच विचार होता. समर्थ रामदासस्वामी जाणूनबुजून
महाराजांची भेट घेण्याचे टाळत होते. असेच काही दिवस गेले. एके दिवशी
समर्थांच्या दर्शनाची ओढ फारच वाढल्यामुळे ते भवानीमातेच्या देवळात गेले.
त्या रात्री ते तेथेच देवीसमोर झोपले. रात्री स्वप्नात त्यांना पायात
पादुका, अंगावर भगवे वस्त्र, हातात माळ, काखेत कुबडी अशा तेज:पुंज रूपात
समर्थ रामदासस्वामींचे दर्शन झाले. शिवाजी महाराजांनी त्यांना साष्टांग
नमस्कार केला. समर्थांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद
दिला. महाराज जागे होऊन पहातात, तर त्यांच्या हातात प्रसादाचा नारळ होता.
तेव्हापासून ते समर्थ रामदासस्वामींना आपले गुरु मानू लागले......
पुढे शिवाजी महाराजांनी पुष्कळ पराक्रम केल्यावर समर्थ
रामदासस्वामींनी स्वत: शिंगणवाडी येथे प्रत्यक्ष येऊन महाराजांना दर्शन
दिले. महाराजांनी त्यांची पाद्यपूजा केली. समर्थांनी त्यांना प्रसाद
म्हणून एक नारळ, मूठभर माती, लीद आणि खडे दिले. त्या वेळी आपण
राज्यकारभाराचा त्याग करून समर्थांची सेवा करण्यात उरलेले आयुष्य
घालवावे, असा विचार महाराजांच्या मनात आला. समर्थांनी महाराजांच्या
मनातील हा विचार ओळखून ते त्यांना म्हणाले, ''राजा, क्षत्रीय धर्माचे
पालन कर. प्राण गेला, तरी धर्म सोडू नको. प्रजेच्या रक्षणासाठी तुझा जन्म
आहे. ते सोडून येथे सेवा करण्यासाठी राहू नको. माझे केवळ चिंतन केलेस,
तरी मी भेटीस येईन. सुखाने, आनंदाने राज्य कर.'' नंतर समर्थांनी त्यांना
राज्य करण्याची आदर्श पद्धती समजावून सांगितली. समर्थांनी महाराजांना
कल्याणासाठी नारळ दिला होता. अत्यंत संतुष्ट आणि तृप्त मनाने छ. शिवाजी
महाराज राज्य करू लागले. महाराजांनी माती म्हणजे पृथ्वी, खडे म्हणजे गड
जिंकले आणि लीद म्हणजे अश्वदल तेही समृद्ध झाले. गुरूंच्या कृपाप्रसादाने
महाराजांना कशाची उणीव भासली नाही.
शिवाजी महाराजांनी परक्या शत्रूंचा बीमोड करून स्वराज्य
स्थापनेची जी कामगिरी चालवली होती, त्यामुळे समर्थांना मोठा अभिमान
वाटायचा. ते लोकांना छत्रपतींच्या कार्यात साहाय्य करण्याचा, तसेच शक्ती
संपादन करून स्वराज्य आणि धर्मरक्षण यांसाठी झगडण्याचा उपदेश करत असत. छ.
शिवाजी महाराजांची समर्थांवर फार श्रद्धा होती. अनेक प्रसंगांत महाराज
समर्थ रामदासस्वामींचा विचार आणि आशीर्वाद घेत असत. संकटाच्या वेळी आपण
सावधगिरीने कसे वागले पाहिजे, याविषयी समर्थांनी शिवाजी महाराजांना
केलेला उपदेश 'दासबोध' या ग्रंथामध्ये आहे. त्यात समर्थ म्हणतात, 'नेहमी
सावधगिरीने वागावे. शत्रू-मित्रांची नीट पारख ठेवावी. एकांतात पुष्कळ
विचार करून योजना ठरवाव्यात. सतत प्रयत्न करत रहावे. पूर्वी अनेक थोर लोक
झाले, त्यांनी पुष्कळ हालअपेष्टा सोसल्या होत्या. न कंटाळता, न त्रासता
अनेकांशी मैत्री जोडून कार्य करत रहावे.'
मित्रांनो, शिवाजी महाराजांना समर्थ रामदासस्वामींच्या भेटीची
ओढ लागली होती. त्यांच्या तळमळीमुळे त्यांना स्वप्नात आणि नंतर प्रत्यक्ष
समर्थ रामदासस्वामींचे दर्शन झाले. तळमळीमुळे आपण कुठलीही गोष्ट साध्य
करू शकतो..........